सोमवार, ६ ऑक्टोबर, २०१४

TET Examination 2014-15

 

TET साठी अतिशय महत्वाचे


 विकासात्मक मानसशास्त्र : 

संपूर्ण जीवनात−गर्भाव्यवस्थेपासून मृत्यूपर्यंत−माणसामध्ये घडून येणाऱ्या शारीरिक-मानसिक व समग्र संघटनात्मक बदलांची यथातथ्य नोंद घेऊन त्यांचा अन्वय लावण्याचा प्रयत्न करणारी ज्ञानशाखा. मानसशास्त्राच्या आधुनिक स्वरूपातील एक शाखा म्हणून विकासात्मक मानसशास्त्राला सु. शंभर वर्षाचा इतिहास आहे. त्यापूर्वीही माणसाला आयुष्यातील विकास गतीची, ऱ्हासाची, त्यातील अटळपणाची जाणीव होतीच. भारतीय आणि पाश्चिमात्य विचारांत अनेक ठिकाणी बाल, कुमार, तरुण, प्रौढ आणि वृद्ध अशा कालखंडांत मनुष्य कसा वागत असतो याची काही निरिक्षणे आणि निष्कर्ष आढळून येतात. रूसो (१७१२−७८), पेस्टालोत्सी (१७४६−१८२७), टीडेमान (१७४८−१८०३) हे अठराव्या शतकातील, तर प्रिअर (१८४१−९७) हे एकोणिसाव्या शतकातील अभ्यासक बालमनाच्या विकासाबद्दल काही संकल्पना मांडत होते; परंतु ⇨ग्रॅन्‌व्हिल स्टॅन्ली हॉल(१८४४−१९२४) यांचा पौगंडावस्थेचा किंवा ⇨किशोरावस्थेचा अभ्यास हाच या शास्त्राच्या आजच्या स्वरूपाचा आरंभबिंदू मानला जातो. ‘बालमानसशास्त्र’ म्हणून बालपणाचा अभ्यास करण्यापाशी हा विषय मर्यादित न करता एकूणच मानवी आयुष्यात घडणारे बदल हाच अभ्यासविषय घेऊन त्याविषयीचे सिद्धांत या शास्त्रात मांडले जातात.
                 ग्रॅन्‌व्हिल स्टॅन्ली हॉल यांनी विकासात्मक अभ्यासाची शास्त्रीय पद्धती बसवली, म्हणून त्यांच्याकडे या शाखेच्या जनकत्वाचा मान जातो. त्यांच्यानंतर ⇨आल्फ्रेड बीने (१८५७−१९११) यांनी मापनपद्धतीचा, ⇨सिग्मंड फ्रॉइड (१८५६−१९३९) ह्यांनी मनोविश्लेषणपद्धतीचा, तर पव्हलॉव्ह (१८४९−१९३६), जे. बी. वॉटसन (१८७८−१९५८), स्किनर (१९०४-९०) यांनी प्रायोगिक पद्धतीचा विकास केला. अभ्यास करताना आवश्यक असलेली वस्तुनिष्ठ तथ्ये कोणत्या स्वरूपाची असावीत याचा पाया त्यामुळे घातला गेला. ⇨ मारिया माँटेसरी (१८७०-१९५२), ⇨झां प्याजे(१८९३−१९८०) यांनी विकासप्रक्रियेतील वैशिष्ट्यपूर्ण घटकांची नोंद करून बालकेंद्री दृष्टीकोन आकारास आणला. नंतरच्या काळात झालेले संशोधन या वैचारिक व्यवस्थांवरच आधारून पुढे गेले.
                    वर म्हटल्याप्रमाणे संपूर्ण जीवनात−म्हणजे गर्भावस्थेतून मृत्यूपर्यंत−माणसामध्ये जे शारीरिक मानसिक व समग्र संघटनात्मक बदल घडतात त्यांची यथातथ्य नोंद आणि अन्वय लावण्याचा प्रयत्न करणारी ही ज्ञानशाखा आहे. आजवरच्या संशोधकांनी विशिष्ट वयोगट, विशिष्ट पैलू आणि विशिष्ट उद्देश धरून आपापले अभ्यास सादर केले आहेत. या सर्वांचा एकत्र विचार करून संपूर्ण जीवनास लागू पडेल असे सूत्र हाती लागू शकेल असे अभ्यासकांना वाटते. त्याचप्रमाणे एखादे सूत्र सिद्धांतकल्पना म्हणून वापरून त्याचा पडताळा घेत राहणे ही देखील एक दिशा संशोधकांना उपलब्ध आहे. अशा अभ्यासातून काही उपायोजनक्षेत्रे सूचित होतात. उदा., भाषिक विकास हा विषय वेगवेगळ्या जीवितसंदर्भात समजावून घेऊन भाषांचे अध्ययन-अध्यापन सुलभ होऊ शकेल, त्याचप्रमाणे एखाद्या घटिताचा दीर्घकालीन परिणाम तपासता येईल किंवा स्वतःच्या व्यक्तिगत जीवनाचा विचारही शास्त्रीय माहितीच्या संदर्भात करता येईल.

उद्दिष्टे व पद्धती : 
              विकासात्मक मानसशास्त्राची उद्दिष्टे वर उल्लेख केलेल्या काही साध्यांशी निगडित आहेत : (१) माहिती उपलब्ध करणे. यात खालील प्रकारच्या अभ्यासाचा समावेश होतो :
(अ) वयपरत्वे आढळून येणारे सर्वसामान्य बदल नोंदविणे.
(ब) विशिष्ट वयोगट व विशिष्ट परिसरातील घटक यांच्या संदर्भासहीत नोंदी करणे.
(क) वयपरत्वे आढळणारे बदल विकासाच्या विविध पैलूंच्या मर्यादेत नोंदणे.
(२) अन्वय व सिद्धांतनिर्मिती. या अंतर्गत पुढील उद्दिष्टे येतात :
(अ) माहितीचे विवरण करून निष्कर्ष काढणे.
(ब) वर्तनबदलाची कारणमीमांसा करणे.
(क) सहसंबंध आणि पूर्वकथनाची शक्यता अजमावणे.
(ड) कोणताही फरक व्यक्तिविशिष्ट आहे, की सर्वसाधारण गुणविशेष आहे हे ठरविणे इत्यादी.
                   या उद्दिष्टांना अनुलक्षून संशोधनातील प्राथमिक तथ्ये ठरतात. त्यांचे स्वरूप, नोंद आणि शक्य असेल त्या सर्व ठिकाणी वस्तुनिष्ठ मापनपद्धतीचा वापर करून ही तथ्ये प्राप्त केली जातात. तुलनात्मक किंवा व्यक्तिभेदात्मक असे या नोंदीचे स्वरूप असते. संशोधन−प्रकल्प ठरविताना संबंधित व्यक्तींच्या वर्तनाचे स्वरूप, महत्त्व, त्यातील वयपरत्त्वे अपेक्षित बदल, प्रत्यक्ष निरीक्षणाची कार्यवाही करण्याची रूपरेषा−म्हणजेच कोण, केव्हा, कोठे, कसे व कशाचे निरीक्षण करणार याचा निश्चित आराखडा−सर्व गोष्टी स्पष्ट कराव्या लागतात. निरीक्षणासाठी ज्या व्यक्तींचे निरीक्षण करावयाचे, त्यांची नोंद त्यांच्या नैसर्गिक संदर्भात, विशिष्ट परिस्थितीत किंवा विशिष्ट प्रायोगिक रीत्या नियंत्रित परिसिथितीत करता येते. प्रत्यक्ष निरीक्षण, माहीतगार व्यक्तीकडून माहिती गोळा करणे, प्रश्नावलींचा वापर करणे, चाचण्या घेणे, मुलाखती घेणे इ. तंत्रे वापरता येतात. तथ्ये गोळा करणाऱ्या व्यक्तींची वैशिष्ट्ये व संख्या यांचाही परिणाम होऊन तथ्ये बिघडू नयेत याची काळजी घ्यावी लागते. संख्याशास्त्रीय विवरण आणि त्या दृष्टीने आकडेवारीचे स्वरूप यांचीही पूर्वनियोजित व्यवस्था करावी लागते.
               एकूणच वैज्ञानिक पद्धतीचे, विश्वसनीयतेचे आणि यथार्थतेचे निकष वापरून अभ्यासपद्धती ठरविल्या जातात.
विकासात्मक अभ्यासाचे कालखंड : मानवी आयुष्यात होणारे बदल नेमकेपणाने अभ्यासता यावेत म्हणून मानवी आयुष्याची एकूण अकरा कालखंडात विभागणी केली जाते. जीवन जरी सलग असले, तरी अभ्यासाच्या सोयासाठी आणि काही खास वैशिष्ट्यांना धरून हे कालखंड मानले जातात :
(१) प्रसूतिपूर्व कालखंड : गर्भधारणेपासून जन्मापर्यंत.
(२) अर्भकावस्था : जन्मापासून दोन आठवडे.
(३) शैशवावस्था : वय दोन आठवडे ते २ वर्षे.
(४) बाल्यावस्था : पूर्वकाल: वय २ ते ६ वर्षे.
(५) बाल्यावस्था : उत्तरकाल: वय १० ते १० वर्षे.
(६) किशोरावस्था : वय १० ते १३−१४ वर्षे.
(७) कुमारावस्था : पूर्वकाल वय १३−१४ ते १८ वर्षे.
(८) कुमारावस्था : उत्तरकाल : वय १८ ते २१ वर्षे.
(९) तारुण्यावस्था : वय २१ ते ४० वर्षे.
(१०) प्रौढावस्था : वय ४० ते ६० वर्षे.
(११) वृद्धावस्था : ६० वर्षे वयानंतरचा काळ.
                         या प्रत्येक कालखंडाचे बारकाईने अभ्यास करणारे विशेतज्ञ आहेत. मानवी विकास ही इतर सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासाचाही विषय असलेली महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे या शाखेच्या अन्य शाखांतील अभ्यासाशी जवळून संबंध पोचतो.
                        भारतातील संशोधनकार्य : आधुनिक विज्ञानाचा भारतीय विचारात प्रवेश इंग्रजी शिक्षणामार्फत झाला. त्यामुळे इंग्रजी शिक्षणातून घडलेल्या संशोधकांना एका परकीय प्रेरणेतून परकीय संकल्पनांना दुजोरा देण्याचे, पडताळा पाहण्याचे दुय्यम कामच दीर्घकाळ करावे लागले. तरीही येथील बालविकासाच्या आणि बालशिक्षणाच्या प्रश्नांना थेटपणे सामोऱ्या जाणाऱ्या व्यक्ती होत्याच. त्यांत ⇨गिजुभाई बधेका (१८८५−१९३९), जुगतराम दवे, ⇨ताराबाई मोडक (१८९२−१९७३) ही नावे अग्रेसर होत. त्यांनी केलेली निरीक्षणे त्यांच्या अंगीकृत कार्याच्या उद्दिष्टांना धरून होती. एका अभ्यासशास्त्र विकसित करण्याचा विद्यापीठीय दृष्टीकोण त्यात नव्हता. परंतु त्यांच्यापर्यंत मारिया माँटेसरीचे विचार व कार्य पोचलेले होते. आधुनिक विज्ञानाच्या विश्लेषक आणि घटलक्षी दृष्टीकोणापेक्षा एक वेगळा समग्रलक्षी विचार भारतीय परंपरेत होता. तो जनरीतींमध्ये काही प्रमाणात साचून पडला होता आणि परंपरेच्या अभ्यासाचे तेज मंद राहिले होते. भारतीय संदर्भात पुढे रेटणारी अभ्यासकांची फळी आपल्याला दिसत नाही. त्यामुळे विद्यापीठातील पदव्युत्तर विभागातील संशोधन हेच भारतीय विचारांचे आजचे केंद्र म्हटले पाहिजे. या दृष्टीने १९३० मध्ये म्हैसूर विद्यापीठातील व्ही. वेंकटाचार यांनी एम्. ए. पदवीसाठी सादर केलेला, जन्मापासून एक वर्ष या कालखंडातील विकासाचा अहवाल हा आरंभ म्हणावा लागेल. त्याला आर्नल्ड गेझेल यांच्या विकासमापनाचा आधार व संदर्भ होता. त्यानंतर १९६०स पर्यंत झालेले अभ्यास वेगवेगळ्या ज्ञानशाखंतील व्यक्तिगत संशोधनाच्या स्वरूपात आढळतात. परंतु त्यातून एखादा भारतीय दृष्टीकोन विकसित झाल्याचे दिसत नाही.
                           एन्‌सीइआर्‌टीच्या (राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण महामंडळ) पूर्व प्राथमिक शिक्षण विभागातून डॉ. राजलक्ष्मी मुरलीधरन् ह्यांच्या नेतृत्त्वाखाली एक राष्ट्रव्यापी संशोधन योजना १९६२ च्या सुमारास हाती घेण्यात आली. त्या योजनेत अडीच ते पाच वर्षे वयातील मुलांच्या विकासात्मक वर्तनाची नोंद करण्यात आली. हे काम अहमदाबाद, अलाहाबाद, मुंबई, कलकत्ता, दिल्ली, हैदराबाद आणि मद्रास ह्या केंद्रात झाले. एकूण ६,९९७ मुलांचा अभ्यासात समावेश करण्यात आला. यांत शहरी, औद्योगिक व ग्रामीण अशा तीन प्रकारच्या वातावरणातील मुले निवडली होती. खेळ, दैनंदिन व्यवहार, खाणे-पिणे, कपडे घालणे, संपर्क-व्यवहार इ. वर्तनाचा अभ्यासात समावेश होता. १९६८ च्या सुमारास ह्या संशोधनाचे अहवाल तयार होऊ लागले. परंतु त्यांतून भारतीय मुलांच्या ह्या कालखंडातील विकासाचे निश्चित स्वरूप आकारलेले दिसत नाही किंवा त्यासाठी पाठपुरावा झालेला आढळत नाही.
                            बडोद्याला महाराजा सयाजीराव विद्यापीठात बालविकास व कौटुंबिक संबंध विभागाने पहिल्या तीस महिन्यातील कारक व मानसिक विकास या विषयांवरील संशोधनास १९६४ मध्ये आरंभ केला. तो अहवाल एक महत्त्वाचा टप्पा होय. परंतु अद्यापही भारतीय अभ्यास अलग अलगच बघावे लागतात. त्यांतून सैद्धांतिक दिशा निर्माण झाल्याचे दिसत नाही.
                          विकासात्मक मानसशास्त्रीय उपपत्ती : सतराव्या शतकात ⇨जॉन लॉक (१६३२−१७०४) यांनी यूरोपीय विचारामध्ये मूल म्हणजे प्रौढ माणसाची छोटी प्रतिकृती नव्हे, हे निरीक्षण स्पष्टपणे मांडले. मुलांचे मन ही एक कोरी पाटी आहे, त्यावर अनुभवाचे संस्कार व आघात होऊन मन आकारास येते. साहचर्य, पुनरावृत्ती, अनुकरण आणि वर्तनपरिणाम या प्रक्रियांमुळे मनाचे रूप विकसित होते; मूल शिकते असे त्यांनी म्हटले. अठराव्या शतकात रूसो यांच्या मांडणीमध्ये मूल एका निसर्गनियतक्रमाने विकसित होते, हा मुद्दा महत्त्वाचा होता. मुलांचे बघणे, विचार करणे, भावना हे सर्व प्रौढांपेक्षा वेगळे असते आणि ० ते २ वर्षे, १२ ते १५ वर्षे आणि १५ ते २१ वर्षे अशा चार टप्प्यांत त्यांचा विकास होतो, अशी त्यांची मांडणी होती.
                         चार्ल्स डार्विन ह्यांच्या उत्क्रांतिवादी विचारसरणीमुळे मानवी विकासाला प्राणिजातीच्या विकासाचा व्यापक संदर्भ मिळाला. त्यातून मानवाचे अन्य प्राणिजातींशी असलेले जैविक साम्य पुढे आले. त्याचप्रमाणे कोणत्या जैविक बदलांमुळे मानव अन्य प्राण्यांपेक्षा वेगळे जीवन प्राप्त करून घेऊ शकतो, याचाही अभ्यास सुरू झाला.
                         अनुवंश आणि परिपक्वन : बालविकासाचा नैसर्गिक आराखडा अनुवंशाने मिळतो आणि विकास पूर्णत्वास नेणाऱ्या नैसर्गिक प्रक्रिया म्हणजे परिपक्वन. मुलाचे प्रतिपालन करणारे कुणीतरी असले, म्हणजे परिपक्वनाने होणारा किमान बदल प्रत्येक व्यक्तीत होतो. ग्रॅन्व्हिल स्टॅन्ली हॉल, लुई टर्मन यांनी या बदलांचा मागोवा घेऊन बौद्धिक क्षमतांमधील अनुवंशाचे कार्य स्पष्ट करण्यास सुरुवात केली. हॉल यांचा कुमारवयाचा अभ्यास आणि टर्मन यांचा बौद्धिक क्षमतांबद्दलचा दीर्घकालीन अभ्यास म्हणजे वैकासिक पद्धतीसाठी लागणाऱ्या चिकाटीचे व दीर्घोद्योगाचे वस्तुपाठच आहेत. आर्नल्ड गेझेल यांनी विकासाचे टप्पे आणि त्यांतील विविध पैलूंचा विकासक्रम निश्चित करण्याचे कार्य केले.
                           परिसर आणि अध्ययन : मानवी विकासाचे निर्णायक नियंत्रण अनुवंशाने होते, की परिस्थितीने होते हा वाद बराच काळ चालू होता. त्यातील पुरावे व तथ्ये मांडण्याची गरज संशोधन पुढे नेण्यास उपयुक्त ठरली. ⇨वर्तनवाद या नावाने ओळखली जाणारी मानसशास्त्रातील सैद्धांतिक भूमिका याही क्षेत्रात विकासातील अध्ययनाचे व परिसराचे महत्त्व विशद करून सांगते. अध्ययन म्हणजे काय? त्याची प्रक्रिया कोणती? त्यात विकासक्रम कसा दिसतो ? अध्ययनाचे नियामक घटक कोणते? यांसारखे प्रश्न प्रयोगशाळेत सोडवण्याची पद्धती आणि परिसरांचे महत्त्व दाखवणारी निरीक्षणे यांचे मोठेच योगदान या सैद्धांतिकांनी दिले. जे. बी. वॉटसन, बी. एफ्. स्किनर, बांडुरा, मिलर, डोलार्ड इ. अमेरिकन शास्त्रज्ञ, तसेच पाव्हलॉव्ह आणि त्यांचे सहकारी यांचा एक मुद्दा असा होता, की अध्ययनाचे निश्चित नियम प्रस्थापित करता येत असल्यामुळे बदलाचे पूर्वनियोजित नियंत्रणही शक्य आहे.
                          नैसर्गिक आचार व समायोजन : चार्ल्स डार्विन यांच्या समग्र मांडणीने प्रभावित झालेला हा विचार आहे. मानवी देहरचना आणि त्यांतील कार्यपद्धती निसर्गदत्त आहेत. परिसराशी समायोजन करताना त्यातील परिसराशी समायोजन करताना त्यांतील काही शक्यतांचा आविष्कार होत असतो. त्यानुसार प्राणिवर्तनात काही साचे किंवा संघात (पॅटर्न्स) तयार होतात. विकास म्हणजे या संघातांतील बदल. या बदलाची दिशा जीवकलहात टिकून राहण्याची क्षमता वाढण्याच्या बाजूला नेते. हे नैसर्गिक आचाराचे तत्त्व होय. जीवरक्षण व वंशसातत्य ही त्यामधील नैसर्गिक उद्दिष्टे होत.
                         मानवी बालकाचा परिपक्वनाचा काळ बारच दीर्घ मुदतीचा असतो. त्यामुळे परिसर नियंत्रित करून फक्त नैसर्गिक स्थितिगतीचा अभ्यास करणे शक्य होत नाही. त्याचप्रमाणे या काळात प्रारंभीचा काळ अवलंबित्वाचा असल्याने पालन करणाऱ्या व्यक्तीचा संबंध अटळ ठरतो. हे कार्य माता किंवा तिची जागा घेणारी व्यक्ती करते. हा मूलभूत संबंध माणसाला लळा लावणारा आणि ताटातूट झाल्यास भावनिक दृष्ट्या आर्त बनवणारा असतो. या दोन्हीचे परिणाम डॉ. जे. बोलबी यांनी अभ्यासले. त्यामधून पहिल्य वर्षातील स्थिर भावबंधांचे महत्त्व स्पष्ट झाले, त्याचप्रमाणे ताटातुटीचे आघात कसे परिणाम घडवतात, तेही लक्षात आले.
                           जे. ब्रूनर यांनी केलेला अध्ययनशीलतेचा अभ्यास : यात मानवी समायोजनातील लवचीकता, उपयुक्त आणि अनुपयुक्त वर्तन, सहेतुक आणि अहेतुक वर्तन त्याचप्रमाणे जिज्ञासेचे जैविक महत्त्व इ. विषय पुढे आले. झां प्याजे यांचे नाव विकासात्मक मानसशास्त्रज्ञ विशेष अन्वर्थक आहे. व्यक्तीचा विकास होताना आत्मभान व परिस्थितीवर नियंत्रण यांचा विचार करून त्यांनी वैकासिक अवस्थांचा सिद्धांत मांडला. ज्ञानक्रियेची मानसिक पाळेमुळे कशी घडतात, कारक आणि बौद्धिक सांधे कसे तयार होतात. त्यांतील संतुलन कसे निर्माण होते हे सर्व त्यांनी अभ्यासात समाविष्ट केले. मनोविश्लेषणवादी भूमिकेतून बालविकासाकडे पाहताना आंतरिक प्रेरणा आणि बाह्य जगातील वास्तव यांच्या आंतरक्रियेचा आलेख ‘मनोलैंगिक विकासाची रूपररेषा’ या स्वरूपात पुढे आला. हा आलेख फ्रॉइड यांनी काटेकोरपणे शारीरिक लैंगिकतेच्या वैशिष्ट्यांना धरून रेखाटला होता. त्यांच्यानंतर ⇨कार्ल गुस्टाफ युंग (१८७५−१९६१), ⇨ॲल्फ्रेड ॲड्लर (१८७०−१९३७) यांच्यापासून एरिक एरिकसन यांच्यापर्यंत अनेकांनी आत्मभानाचा, स्वत्वकल्पनेचा, अस्मितेचा विचार बहुघटकीय आणि सामाजिक संदर्भासहित केला. त्यात ‘स्व’ची घडण आणि ‘स्व’ चे योगदान या दोन्हींचा विचार अधिक विस्तृत व खोल होत गेला.
                             मानवलक्षी भूमिका : अब्राहम मॅस्लो यांनी माणसाचा विचार प्राण्यांच्या बरोबरीने करण्यापेक्षा मानवाला प्राप्त असलेल्या पातळीवरून करायला हवा, असे प्रतिपादन करून माणसाच्या विकासप्रक्रियेचे अवलंबित्वाकडून सक्षमतेकडे आणि सक्षमतेकडून उन्नयनाकडे असे सलग स्वरूप विशद केले. माणूस प्राणी असला, तरी फक्त प्राणी म्हणून त्याच्या विकासाकडे पाहणे पुरेसे नाही ही त्यांची भूमिका. मनुष्य स्वतःच्या बीजरूपाचा विकास साधण्यासाठी आतूनच क्रियाशील असतो याकडे त्यांनी लक्ष वेधले आणि गरजांची एक तार्किक उतरंड मांडली. ज्याप्रमाणे उणीव भरून काढण्यासाठी अनेक प्रेरणा कार्यान्वित होतात, त्याचप्रमाणे आत्मोन्नती, आत्मविष्कार किंवा विशेष मानसिक संपन्नता देणाऱ्या अनुभूतीसाठीही खास ‘मानवी’ प्रेरणा कार्यान्वित होतात. अशा प्रेरणांचा आविष्कार ज्या व्यक्तींमध्ये आढळतो त्यांचा मॅस्लो यांनी केलेला अभ्यास हा या सिद्धांताचा प्रमुख आधार होय. त्याला धरून मानवलक्षी मानसशास्त्र (ह्यूमॅनिटिक सायकॉलॉजी) अशा नावाने स्वतंत्र प्रणाली सुरू झाली.
                               विकासाची व्यवस्थात्मक संकल्पना : अगदी अलीकडे डोनाल्ड फोर्ड आणि रिचर्ड लर्नर यांनी विकासाची एक व्यवस्थात्मक संपल्पना सादर केली आहे. विकास म्हणजे टिकाऊ स्वरूपाचा गुणात्मक आणि विविधता वाढवणारा बदल, अशी व्याख्या करून या संपूर्ण बदलाच्या प्रक्रियेत सहभागी असणारी रचना व कार्य, त्यातील मर्यादा आणि शक्यता, त्याच्या दिशा व परिणत यांबद्दल त्यांनी काही उलगडा केला आहे.
                              विकासाच्या व्याख्येत त्यांनी अन्य वैशिष्ट्येही नमूद केली आहेत. विकास घडताना योजनाबद्ध, अनुक्रमिक, आनुवंशिक गुणांमधून झालेले आणि परिसराशी व्यक्तीची विशिष्ट आंतरक्रिया घडून प्रत्यक्षात येणारे असे विविध प्रकारचे बदल होत असतात. विकासाला दिशा असली, तरी त्याचा शेवट स्थिर किंवा नियोजित नसतो. त्या दिशाही वेगवेगळ्या असू शकतात, त्यात मूल्यभावाचा प्रश्न नाही. व्यक्तीचा स्वतःचा निर्णय पूर्वेतिहास बाजूला सारून बदल घडवून आणू शकतो. अशा बदलातून नव्या शक्यता व्यक्तीसमोर येतील व त्यांतून नवी निवड होऊ शकेल. यामुळे काही बाबतीत विकास निरंतर व विशिष्ट दिशेने घडेल, तर काही बाबतीत खंडित, अल्पकालीन राहील. या संकल्पनाव्यूहात भूतकाल व भविष्यकाल यांचे नाते सतत परिवर्तनशील राहू शकते, या गोष्टीला महत्त्व आहे. ज्या रचना आणि जे बंध विशिष्ट परिस्थितीत तयार होतात, त्यांत व्यक्ती स्वतःच्या प्रयत्नाने बदल घडवते हेही विकासाचे सुकाणू त्या त्या माणसाच्या हाती देणारे खास तत्त्व होय. एकविसाव्या शतकाकडे जातानाची ही स्वत्वधारणा म्हणता येईल.
भारतीय पारंपारिक विचार : या सर्व उपपत्ती आजच्या विकासात्मक मानसशास्त्राच्या प्रगतीस हातभार लावत आहेत. भारतीय परंपरेतील समग्रलक्षी विचार आज आधुनिक संकल्पनाव्यूहांमध्ये बसत नाही. परंतु त्यातील विचाराची तार्किक चौकट वापरून आधुनिक तंत्राने अभ्यास करणे शक्य आहे. आयुर्वेद माता−बालक संबंधाला महत्त्व देतो. बालकाचा विकास आणि संगोपनपद्धती यांतील नातेही त्यात सांगितले आहे, तसेच काही विधिनिषधेही सांगितले आहेत. सोळाव्या वर्षापर्यंत पाच टप्पे सांगितले आहेत. (१) गर्भावस्था, (२) क्षीरदावस्था : पहिले सहा महिने, (३) क्षीरान्नदावस्था : ६ महिने ते २ वर्षे, (४) बाल : २ ते ५ वर्षे, (५) कुमार : ५ ते १६ वर्षे. या प्रत्येक अवस्थांतराच्या सुमारास एकेक संस्कारविधी सांगितला आहे. प्राचीन भारतीयांच्या विचारपद्धतीत समग्रता आणि संघात यांच्या आकलनाला आणि सूक्ष्म भेदांना विशेष स्थान होत. समग्रलक्षी दृष्टिकोण (होलिस्टिक ॲप्रोच) आणि संघात-विश्लेषण (पॅटर्न अनॅलिसिस) या मार्गाने विचार केल्यास आज घटकलक्षी आणि विभाजननिष्ठ अभ्यासातून साध्य झालेल्या तथ्यांकडेही वेगळ्या प्रकारे पाहता येईल व त्यांचा अन्वयही लावता येईल. बालसंगोपणासाठीची काही महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्वेही यातून हाती येतात. त्यांपैकी काही भारतीय समाजात दीर्घकाळ टिकून होती. त्यांची कदाचित आधुनिक संदर्भात पुनःप्रस्थापना करावी लागेल, काही बदल अपरिहार्यपणे करावे लागतील.
विकासप्रक्रियेचा आवाका : मूल जन्माला येते तेव्हापासूनच त्याच्याभोवती सामाजिक संदर्भ असतो. त्याची एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून कार्य करू लागेपर्यंत जी वाटचाल होते, तिचे विशेष खालीलप्रमाणे:
(१) शारीरिक दृष्ट्या अर्भक ते पूर्ण वाढ झालेला देह घडणे.
(२) संपूर्ण परावलंबित्वापासून संपूर्ण स्वावलंबी बनणे.
(३) सामाजिक अजाणतेपासून प्रावीण्यापर्यंत पोहोचणे.
(४) जीवनात जबाबदारीची जाणीव निर्माण होणे.
विकासप्रक्रियेची रूपरेखा : विकासाच्या अनेक संकल्पना वर सांगितलेल्या सैद्धांतिक भागात आल्या आहेत. त्यांमधून आज सर्वमान्य तत्त्वे हाती लागली आहेत, ती पुढीलप्रमाणे :
(१) गर्भधारणेपासून मृत्यूपर्यंत वाढ आणि गुणात्मक बदल या दोन्ही प्रकारे विकास घडतो.
(२) विकासाची गती सर्व कालखंडात सारखी नसते. एकवीस वर्षापर्यंत जलद, एकवीस ते चाळीस स्थिर आणि त्यानंतर उतार असा या गतीत बदल होतो.
(३) विकास पायरीपायरीने होतो. एक बदल घडल्यानंतर तो पचनी पडण्यात काही वेळ जातो आणि पुढचा टप्पा येतो. या प्रत्येक पायरीवर काही ठराविक वैशिष्ट्ये आढळतात.
(४) शारीरिक, बौद्धिक, सामाजिक, भावनिक, व्यक्तिमत्त्व संघटनात्मक असे अनेक पैलू विकसित होत असतात. परंतु त्यांचा वेग वेगवेगळा असतो. त्यांचा एकमेकांवर परिणामही होत असतो.
(५) आधीच्या कालखंडात झालेला विकास पुढील कालखंडातील विकासाचा आधार ठरतो. त्यामुळे पहिल्या सहा वर्षांतील विकास महत्त्वाचा मानला जातो.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा